Wednesday, December 14, 2011

गझलवर संगीताचे आक्रमण... किती खरे किती खोटे ?


फुल पातों से नही रंगसे चुना जाता है
भोर हाथोंसे नही तम से बुना जाता है
प्राण की पीर पुकारों मे जगाने वालो
गीत कानो से नही दिल से सुना जाता है...

          स्नेहलता स्नेह नावाची ही कवियत्री गीत कसे ऐकावे हे यातून सांगते.कानापेक्षा मनापासून ऐकल्याने कोणत्याही गीत प्रकाराचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येतो.पण गझलच्या बाबतीत मात्र यापेक्षा अधिक काही तरी हवे असते. गझल शब्दांदारे असो वा स्वरांद्वारे सरळ ऐकणा-यांच्या मनात उतरायलाच हवी.मग ती कानाने ऐको वा मनाने ! याचाच अर्थ असा,की शब्द आणि स्वरांनी बरोबरीने हातात हात घालून,एकमेकांचा आब राखून खेळत-बागडत, निर्व्याजपणे रसिकांपुढे यायला हवे. गझल गायन हे सुगम गायन नाही.पण लोकांचा तसा समज आहे,किंवा करून दिला गेल्या आहे.सुगम संगीतापेक्षा थोडे हटके असल्यामुळे माझ्या मते याला सुगम-शास्त्रीय किंवा उप-शास्त्रीय म्हणायला हरकत नसावी.सुगम संगीताला गायक,कवी,संगीतकार अशा अनेकांची साथ लाभते.गझल गायकाला मात्र गायक,संगीतकार व वादक (बहुतेक गझल गायक उत्कृष्ट हामोनियम असल्याचे दिसून येते.)अशा तिहेरी भूमिका वठवाव्या लागतात.शास्त्रीय संगीतासोबच भाषेचाही व्याकरणासह सखोल अभ्यास करावा लागतो.आज आपल्यासमोर अनेक गझल गायक आहेत.परंतू बेगम अख़्तर,मेहदी हसन,फ़रीदा खानम,ग़ुलाम अली आणि जगजितसिंग हीच नावे का आठवतात ? याचे कारण त्यांचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास,शब्द-स्वरांची समज,स्वतःच स्वतःची विकसित केलेली गान शैली हे आहे.आपल्या देशात इतरही अनेक गायक-गायिका आहेत.परंतू त्यातील कोणी चांगला संगीतकार आहे तर कोणी चांगला गायक.गझल गातांना,गाणा-यातला गायक आणि संगीतकार हे दोघेही समतुल्य आणि समन्वयक असले तरच ते चीरकाल टिकणारी गायकी देऊ शकतात.

"दिल--नादाँ तुझे हुआ क्या है
आख़िर इस दर्द की दवा क्या है"

          ही गझल अनेक गायक,गायिकांनी गायिली आहे.परंतू काही निवडकच गायकांच्या आवाजात ती श्रोत्याना आवडते.त्यातल्या त्यात मेहदी हसनच्या आवाजाने तर काळीजच पोखरत जाते.गझल मांडणीसाठी स्वरांचा कसा उपयोग करावा याचे हे एक मोठे उदाहरण आहे.शास्त्रीय संगीतातील अविर्भाव-तिरोभाव,मुर्छना आदि प्रकारांचा उपयोग मेहदी हसन आणि जगजितसिंग यांनी जसा केला, तसा इतर गायकांनी केल्याचे आढळत नाही.ग़ुलाम अलींनी हे न करताही गमक,मुरकी,मींड,नोटेशन याचा वापर करून आपल्या गायकीने गझल अत्यंत श्रीमंत करुन ठेवली.बेग़म अख़्तर पर्यंत गझल गायकीवर शास्त्रीय संगीतातील दादरा,ठुमरी,कजरी,चैती या गान प्रकाराची छाप प्रकर्षाने जाणवते.मेहदी हसन,ग़ुलाम अली यांच्याही सुरवातीच्या गझलांवर हा प्रभाव दिसतो.पण अख़्तरी बाईंपेक्षा मेहदी हसन यांनी शब्दांना प्राधान्य देऊन एक एक शब्द सुरांच्या गोलाईने भरून ऐकणा-यांपर्यंत स्पष्टपणे कसा जाईल याचा विचार जास्ती केलेला दिसतो.ग़ुलाम अलींच्या गझल गायनात कधी स्वरांचे प्राबल्य तर कधी शब्दांचे प्राबल्य्र जाणवते.पण एकूणच त्यांच्या गझल गायकीने जनमानसावर मोहिनी घातली आहे.या सगळ्यात जगजितसिंगची गायकी मात्र आणखीनच वेगळी ठरते.काळीज भेदणारा आवाज,उर्दूचा ’सच्चा’लहजा, शास्त्रीय संगीतावरील मजबूत पकड आणि सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची मानसिकता यामुळे त्यांच्या तुलनेत भारतातील इतर गझल गायकांचा विचार केला तर त्यांच्या उंचीला कोणीच पोहिचले नाही असे खेदाने म्हणावे लागते.(या बद्दल दुमत असू शकते.)चित्रा सिंगच्या बाबतीत काहीही प्रवाद असले तरी तिने गायिलेल्या मिर्झा ग़ालिबया मालिकेतील गझला काळजाला भेदून जातात.या दोघांचे गझल गायकीतील योगदान विसरता येण्यासारखे नाही.अनूप जलोटानेही सुरवातीच्या काळात सुंदर गझला रसिकांना दिल्या.तसेच सर्वसामान्यांपर्यंत गझल पोहचवण्याचे काम पंकज उधास यांनी केले आहे.
           मेहदी हसन,ग़ुलाम अली आणि जगजितसिंग या तीन गायकांनी गझल मांडणीसाठी केलेला स्वराविष्कार आणि विचार अतिशय प्रबुद्ध आहे.शब्दातील भावपक्ष कायम ठेवून शेर मांडणे,योग्य ठिकाणी जोड रागांचा वापर करणे,शेरांची मांडणी करतांना मध्यस्थ स्वरांचे महत्व जपणे,अफाट मेहनत,सुक्ष्म विचार,ताल-स्वरांची सौंदर्य दृष्टी ह्या यांच्या गझल गायनातील अतिशय महत्वाच्या आणि भक्कम बाबी आहेत.त्यामुळेच स्नेहलता स्नेहच्या म्हणण्याप्रामाणे कानो से नही दिलसे सुननेवालीबात,इतर गीतांच्या बाबतीत लागू होईल पण गझलच्या बाबतीत सगळी जबाबदारी ऐकणा-यांवर टाकणे मला पटत नाही.’ग़ज़ल अपने आप दिलमें उतरनी चाहीए’. ती उतरण्यासाठी त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचायला हवी.त्यातही मार्केटिंगहा महत्वाचा पैलू आहेच...आजच्या काळात हे ही जमायला हवे,व ते ही जमायला हवे.उलट मी असं म्हणेन की ’ते’ नाही जमले तरी ’हे’मात्र जमायलाच हवे....नाही तर त्याचा सुधाकर कदम झाल्याशिवाय राहात नाही....हुसैन बख्श हा माझा आवडता गझल गायक आहे.पण आज तो किती जणांना माहित आहे ? असो...
माझी गझलशी तोंड ओळख १९६६/६७ च्या दरम्यान यवतमाळला आँर्केस्ट्रा मध्ये असतांना झाली.प्रँक्टीस संपल्यावर रात्री १२/१ च्या नंतर पाकिस्थान रेडिओ लावून गप्पा मारत बसणे,जेवणे वगैरे चालायचे.सकाळी ४/५ ला सर्वजण आपापल्या घराकडे निघाल्यावर झोपायचे,असा आमचा ’रात्र’क्रम होता.त्यावेळी बरकत अली खान,अमानत अली खान,मुन्नी बेगम,इक्बाल बानो,मल्लिका पुखराज,सलामत-नज़ाकत अली, मेहदी हसन,नुरजहान नंतर नंतर ग़ुलाम अली,यांचे गझल गायना सोबतच शास्त्रीय संगीत सुद्धा मनसोक्त ऐकायला मिळाले.त्या काळात रेडिओला पर्याय नव्हता व रात्री फक्त पाकिस्थान रेडिओच सुरु राहात असे.त्यामुळे सतत ऐकून ऐकून मेहदी हसनशी तेव्हा झालेली मैत्री आजतागायत कायम आहे.मेहदी हसन नंतर माझे टाळके सरकवले ते ग़ुलाम अली आणि जगजितसिंग यांनी...दोघांच्या दोन त-हा...पण दोन्हीही काळजात हात घालणा-या.गुलाम अलीच्या गळ्यात हार्मोनियम फिट केली की काय असे वाटावे इतका तयार गळा,हार्मोनियमवर फिरणारी बोटे व डोक्यातील कल्पना सगळे एकजीव होऊन इतक्या आक्रमकपणे पुढे येई की चांगल्या चांगल्या गायक,वादक आणि संगीतकारांनी सुद्धा आश्चर्याने तोंडात बोट घालावे.या उलट जगजितसिंगचे...यांना ऐकणे माझ्यासारख्या खेडे गावात राहणा-याला खूप कठीण जायचे.पुढे पुढे रेकाँर्ड प्लेअर,कँसेट प्लेअर आल्यामुळे या मंडळींना ऐकणे सोपे झाले. आँर्केस्ट्राच्या या काळात गझलने केलेले गारूड मला गझल गायकीकडे घेऊन जाईल असे कधीच वाटले नाही.पण सुरेश भटांची भेट झाली आणि मी मराठी गझल गायकीत स्वतःला झोकून दिले.
सुरेश भट व डाँ.नईमभाई यांच्यामध्ये अमरावतीत रंगलेल्या चर्चांमुळे माझा गझलचा अभ्यास आपोआप होत गेला, त्यांनी भटांना इस्लामपूर्व गझलेचा शेर काढून दिला त्या प्रसंगी मी आणि भटांचे जीवलग मित्र वलीभाई उपस्थित होतो.मलाही ख-या अर्थाने गझल कळली ती या दोघांच्या चर्चेतून आणि त्यानंतर भटांसोबतच्या बैठकीतून... या बैठकांमध्ये उर्दू गझल व मराठी गझल याची तुलनात्मक चर्चा,त्यातून येणारे नवनवीन मुद्दे,माहिती,बहर,व्याकरण,रदीफ,काफिया,मिसरा,उर्दू गझल गायकांची गायकी,शब्दफेक,स्वररचना,गाण्याच्या पद्धती वगैरे-वगैरे अनेक विषयांवर रात्र-रात्रभर खल चालायचा.सुरेश भट आर्णीला मुक्कामी असले की या चर्चेत कवी कलीम खानही सहभागी व्हायचे.(माझ्या बहुतेक कार्यक्रमाचे सूत्र संचालन कलीम खान करायचे.ते स्वतः उर्दू,मराठीचे जाणकार असून उत्कृष्ट कवी आहेत.आपल्या माहितीसाठी या लेखाच्या शेवटी त्यांच्या रचना देत आहे.)त्यावेळी गझलशिवाय दुसरा विषय नसायचा.मराठी गझल गाणा-यांपासून लिहीणा-यांपर्यंत सा-यांवर ही चर्चा असायची. या चर्चेत गाणा-यांनी लिहीणा-यांवर किंवा लिहीणा-यांनी गाणा-यांवर अतिक्रमण करण्याचा विषय कधीच पुढे आला नाही.मात्र काही वर्षांपुर्वी एका पुस्तकात "संगीताचे गझलेवरील अतिक्रमण" या लेखावरील भाष्य वाचल्यापासून त्यावर लिहावे-लिहावे करता करता जवळ-जवळ सहा वर्षानंतर लिहून झाले.ते आपणासमोर ठेवत आहे.नीर-क्षीर विवेक बुद्धीने या लेखावर आपल्या प्रतिक्रीया नोंदवाव्या,ही विनंती.
           त्या लेखावरील भाष्यात गायकांवर गझल हडपण्याचा आरोप केला आहे. तो मला मान्य नाही.
कारण गायक ही माझी गझल आहे असे कधीच म्ह्णत नाही. तो कवीच्या नावाचा उल्लेख करतोच. गेल्या ३५/४० वर्षांच्या कालावधीत मी अनेक कवींच्या रचना स्वरबध्द केल्या, गायिलो,गाऊन घेतल्या आणि अजुनही गाऊन घेत आहे.परंतू कवीच्या नावाचा उल्लेख करूनच. जगजितसिंगची गझल, मेहदी हसनची गझल असा उल्लेख श्रोते करतात, गायक नाही ! त्यामुळे याला जबाबदार गायक होवू शकत नाही. आणि श्रोत्यांचीही फार मोठी चूक होते, असे नाही. ज्या गायकाच्या तोंडून ती श्रोत्यांच्या कानावर पडून लोकप्रिय होते. ती गझल कोणी लिहीली याच्याशी श्रोत्यांना काहीच देणे घेणे नसते. ज्याच्या तोंडून ऐकली असेल त्याचेच नाव ऐकणा-यांच्या तोंडी बसते.त्याला काहीच इलाज नाही. चिकीत्सक जाणकार किंवा रसिक मात्र ती गझल कोणी लिहीली हे माहिती करून घेतात. या प्रकाराला अतिक्रमण म्हणावे का ? तसेच "आशयप्रधान गायनात संगीताला फ़ारसा वाव नसावा" असेही म्हटल्या जाते. यालाही तसा कही फारसा अर्थ नाही.कारण शब्दांना स्वरांचे योग्य अवगुंठन बसले तर ज्या रचना नुसत्या वाचून लोकांच्या मनाचा ठाव घेवू शकत नाही त्या रचना लोकांना आवडायला लागतात, हा माझा अनुभव आहे. "या एकलेपणाचा छेडित मी पियानो" ही स्व..रा.गिरींची रचना शब्दानुरुप स्वररचना करुन कार्यक्रमात सादर करायला लागल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात फ़रमाईश व्हायला लागली. तो पर्यंत ही रचना लोकांना माहितही नव्हती. त्यामुळे मला वाटते की कवी आणि रसिक यांच्यातील माध्यम किंवा दुवा हा गायक असतो. त्यामुळे त्याला कोणत्याही काव्य प्रकारावर अतिक्रमण करण्याची गरज नाही. सुरेश भटांची "हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही" ही गझल आणि माझी चाल एक रात्रीत तयार झाली. ती गझल भटांची आहे हे कार्यक्रमात सांगूनही सुधाकर कदमची हे तुझे अशा वेळी ऐकली काअसे जर श्रोते म्हणत असतील तर त्यात माझा काय दोष ? त्याला लुटारुपणा म्हणावा का ? शब्दाला पोषक स्वर किंवा स्वराला पोषक शब्द हा सुगम संगीताचा महत्वाचा पैलू आहे. गझल गायनही सुगम संगीत प्रकारामध्येच मोडते. त्यामुळे थोडे फार इकडे-तिकडे होणारच.आणि फारच गंभीरपणे विचार केला तर संगीताच्या अभिव्यक्तीला शब्दांच्या कुबडयांचीही गरज नाही हे वाद्यसंगीतावरून कोणाच्याही लक्षात येईल. तसे नसते तर ४०/४२ वर्षांपुर्वीची "काँल आफ दी व्हँली" ही संतूर,बासरी आणि गिटार या वाद्यसंगीताची रेकाँर्ड लोकप्रिय झालीच नसती.(या रेकाँर्डने त्यावेळचे विक्रीचे सर्व उच्चांक मोडीत काढले होते.)सरोद,सितार,संतूर, बासरी,शहनाई,व्हायोलिन वैगरे वाद्यांना कुठे शब्दांची गरज असते ? बिना शब्दांनीसुद्धा ते श्रोत्यांना मोहवितातच ना ? त्यामुळे गझलेवर संगीताचे अतिक्रमण वगैरे या भाष्याला फ़ारसा अर्थ राहात नाही. हा, हे मात्र खरे की गायकाने शब्दानुरुप स्वररचना करायला हवी. कवीला काय म्हणायचे ते श्रोत्यांपर्यत स्पष्टपणे पोहोचवायला हवे. शब्दोच्चार स्पष्ट असावे. आणि कवीच्या नावाचा उल्लेख करायलाच हवा,हे माझे मत आहे.
शास्त्रीय संगीत लोकसंगीतापासून तयार झाले. सुरवातीच्या काळात शब्दांशिवाय गुणगुणणे असा प्रकार होता. हळु हळू गुणगुणण्यासोबत शब्दांचाही वापर व्हायला लागला. आणि नंतरच्या काळात लोकगीतांच्या सुरावटीवरुन संगीताचे व्याकरण तयार होवून किंवा राग निर्मिती होवून व्याकरण तयार झाले. अजूनही राग निर्मिती करणा-यांची नावे कोणालाच माहित नाही. आणि श्रोत्यांना त्याच्याशी देणे घेणेही नसते. "भीमसेनचा तोडी ऐकला का" ? "जसराजचा दरबारी ऐकला का" ? किंवा "किशोरीचा भुपाली खरोखरच ऐकण्यासारखा आहे". असेच उद्गार ऐकणा-यांच्या तोंडून निघतात. म्हणून काही या मंडळींनी यावर अतिक्रमण केले असे म्हणता येणार नाही. माझ्या दृष्टीने गायक हा फ़क्त माध्यम असतो. त्याची प्रस्तूती ही त्याच्या प्रकृतीनुसार असते. एकच राग विभीन्न गायकांच्या गळ्यातून वेगवेगळी अनुभूती देत जातो. तसेच वेगवेगळे गझल गायक जरी एकच गझल गात असले तरी त्यांची स्वर रचना, त्यांच्या ढंग,त्यांचे सादरीकरण वेगळे राहणारच. या सर्व बाबींवरुन कोणी कोणावर अतिक्रमण करीत आहे असे का वाटावे हे मला कळले नाही. सर्वसामान्य श्रोता ज्याच्या तोंडून जे ऐकले त्याचे श्रेय गाणा-याला देतो यात अतिक्रमण वगैर प्रकार नाही. जर एखादा गायक दुस-या कवीची रचना आपल्या नावावर खपवत असेल तर त्याला आपण अतिक्रमण किंवा तस्करी म्हणू. जाणकार आणि सर्वसामान्या श्रोता, यातील जाणकार हा गझलकाराचे नाव लक्षात ठेवेल. पण सर्वसामान्य रसिक मात्र गायकाचेच नाव लक्षात ठेवणार याला गायक तरी काय करणार ? यावर एवढेच म्हणावेसे वाटते की कवी, संगीतकार,गायक यांनी एकमेकांच्या हातात हात घालून मराठी गझल व गझल गायकी पुढे नेण्याचा प्रयत्न करुन मराठी गझलला सोन्याचे दिवस दाखवावे.बस्स..........

सुधाकर कदम
सी१सी/१३,गिरीधर नगर.वारजे-माळवाडी,
मुंबई बंगळूर महामार्ग.पुणे ५८
२६/११/२०११
kadamsudhakar59@gmail,com
(एका रोमँटिक मराठी गझलचा मतला व एक शेर.)

मोगरा वेणीत पोरी माळण्याचे दिवस आले
अन्‌ अता हळव्या जीवांना जाळण्याचे दिवस आले

करुनिया लटकाच आता लक्ष्य नसल्याचा बहाणा
पदर वरती ओढणेही टाळण्याचे दिवस आले...कलीम खान.

(उर्दू गझलचा मतला व काही शेर)

जलाए जब तुम्हे शबनम तो मुझको याद कर लेना
उभर आए पुराना ग़म तो मुझको याद कर लेना

तुम्हारे मन के आंगन में,अकेलेपन के पायल की
कभी होने लगे छम छम,तो मुझको याद कर लेना

भले ही भूल जाओ तुम, मुझे ता-ज़िंदगी लेकिन
सुनो जब मौत की सरगम,तो मुझको याद कर लेना...कलीम खान.

’दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...’


         
मिर्झा गालिब यांची ही गझल म्हणजे म्हणजे दर्दी रसिकांच्या काळजातील जीवघेणी कळ आहे,असे मला वाटते.प्रत्येक माणसाच्या मनातदिल--नादाँ तुझे हुआ क्या है...’ ही भावना कधी ना कधी उद्भवतेच.अशा वेळीआखिर इस दर्द की दवा क्या है...’ हा ही प्रश्न उभा राहतोच.उदासलेल्या मनाला ही गझल त्यामुळेच अतिशय जवळची वाटते.या गझलच्या लोकप्रियतेच्या बाबतीत विचार केला तर,हिच्या इतकी लोकप्रियता दुसर्‌या कोणत्या गझलच्या वाट्याला आली असेल असे मला वाटत नाही.चित्रपटांमध्येही या गझलचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.१९४३ मध्येहंटरवालीकी बेटी’,१९४९ मध्येअपना देश’,१९५४ मध्ये मिर्झा गालिब’,आणि पाकिस्थानातीलमिर्झा गालिब’या चित्रपटांमध्ये ही गझल चित्रपट गीतांच्या स्वरुपात अनुक्रमेपुष्पा हंस’,’तलत-सुरैय्या’आणि मल्लिका--तरन्नुम नुरजहान यांनी ही गझल गायिली आहे.या व्यतिरिक्त शाहिदा परविन,सुमन कल्याणपुर,परवेज़ मेहदी,जगजित-चित्रा,शुमोना राय बिस्वास,पिनाज मसानी आबेदा परविन आणि मेहदी हसन यांनी या गझलला आपापल्या परीने गायकीचा रंग देवून सजविली आहे.या मध्ये शुमोना राय बिस्वास आणि मेहदी हसन यांनी गायिलेली गझल मला विशेष करून आवडली.शुमोनाची गझल गायकी इतकी सुंदर असतांनाही तिचे नाव रसिकांना पाहिजे त्या प्रमाणात माहित नाही याचे नवल वाटते.तिचा ’dagha-sung by Shumona Roy Biswas' हा अल्बम म्हणजे रसिकांना खरोखरच मेजवानी आहे.ही गायिका इतकी सुंदर गाते की ऐकत राहावे असे वाटते.
           
खालील VDO मध्ये शुमोना राय बिस्वास , मेहदी हसन, सुमन कल्याणपुर,शाहिदा परविन,जगजित-चित्रा सिंग, पिनाज़ मसानी यांनी गायिलेल्या संपुर्ण गझल आहे.शुमोनाची बंदिश पटदीप रागावर आधारित असल्यासारखी वाटते,पण लगेच त्यात इतरही रागांचा उपयोग केल्यामुळे एका रागाचे नाव सांगता येणार नाही.मेहदी हसन यांची बंदिशशुद्ध सारंग’ या रागात बांधलेली आहे.हा माझा आवडता राग आहे.सारंगाच्या इतर प्रकारापेक्षा हा वेगळाच आहे.याला शुद्ध सारंग का म्हणतात हे ही एक कोडेच आहे.कारण कोणत्याच सारंग प्रकारात लागणारातीव्र मध्यम’ या मध्ये लागतो.या रागाचा गानसमय शास्त्रीय व्याख्येनुसार दुपारचा आहे.पं.जसराजजींनी गायिलेला शुद्ध सारंग मनभावन असून,छोटा ख्याल तर लाजवाबच.संगीतकार .पी.नैय्यर यांनी आशा भोसलेच्या आवाजातीलछोटासा बालमा...’या गाण्यात केलेला या रागाचा वापर अवर्णनीय आहे.तसा उपयोग चित्रपट संगीतात अभावानेच आढळतो.या नंतर तसे स्वरशिल्प मेहदी हसन यांनीच उभे केले आहे.त्यातील दोन्ही मध्यमांचा उपयोग तर’क्या बात है....!’(याच रागातील हरिहरन यांनी गायिलेलीज़ब्ते ग़म का सिला दे जाना...’ही गझल रसिकांनी जरूर ऐकावी.म्हणजे शुद्ध सारंगशी आपली मैत्री पटकन होते इतरांच्या गझलांविषयी पुन्हा कधीतरी.)चला तर ऐकू या...दिल--नादाँ......
दिल--नादाँ तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्द की दवा क्या है

हम है मुश्ताक और वो बेज़ार
या इलाही ये माजरा क्या है

मैं भी मुह मे ज़ुबान रखता हूँ
काश पुछो की मुद्दा क्या है

जबकी तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा अय खुदा क्या है

ये परी चेहरा लोग कैसे है
गमज़ा--इश-- अदा क्या है

सब्ज़ा--गुल कहाँ से आये है
अब्र क्या चीज़ है,हवा क्या है

हमको उनसे वफ़ा की है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है

जान तुमपर निसार करता हूँ
मैं नही जानता वफ़ा क्या है

मैने माना की कुछ नहीं ग़ालिब
मुफ़्त हात आये तो बुरा क्या है

ग़ालिब

टीप-खालील पोष्ट मध्ये अनुक्रमे शुमोना राय बिस्वास, मेहदी हसन,सुमन कल्याणपुर,शाहिदा परविन,जगजित-चित्रा सिंग, पिनाज़ मसानी यांचे VDO आहेत.






"रंज की जब गुफ़्तगू होने लगी..."

        जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य,चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.
          कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न
होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. ) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. ) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच.   
          एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की, हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने
निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर लेलेल्या वक्तव्यात आहे.
         आजचा आपला विषय आहे  राग भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पुर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वैगरे वैगरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या सहेलामुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल आँफ दी व्हँली"तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...
          भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी हरे रामा हरे कृष्णाया चित्रपटातील कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले भाभी की चुडियाया चित्रपटातील ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच लव्ह इन टोकियोया चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे रिषभावरमुर्छना केली की मधमाद सांरग’, ’गांधारावरमुर्छना केली की मालकौंस’, ’पंचमावरमुर्छना केली की दुर्गाराग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.
          या वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येणा-या भूपात रंज की जब गुफ़्तगू होने लगी,आपसे तुम तुमसे तू होने लगीही दाग़ यांची गझल गुलामअली गायले आहेत. मतला पूर्णपणे भूपात बांधला आहे. अंत-यातील...काही शेर भूपाला कल्याणाची जोड देऊन इतक्या सुंदर रीतीने सादर केले की तोंडून आपोआपच वाहव्वा निघून जाते. तानांच्या छोट्या छोट्या लडया,वरच्या पंचमापर्यंतची रुपक तालाशी खेळत खेळत केलेली स्वरांची कलाकुसर आपल्याला थक्क करते. सोबतच सुरेल नोटेशनसह विविध प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण तिहाया,विवादी स्वर घेऊन विविध रागाच्या छटा दाखवून वाढवलेली रंजकता,मक्त्यामध्ये केलेले जयजयवंती रागाचे लोभस मिश्रण गुलामलीच्या परिपूर्ण गायकीची ग्वाही देते.या गझल सोबतचा तारिक हुसैन यांचा तबला म्हणजे सोने पे सुहागा...’! असा तबला भारतातील गझलच्या साथीदारांकडून ऐकायला मिळत नाही.यात त्यांनी टाकलेल्या तबल्याच्या विविध विधा,तुकडे,मुखडे आणि वेगवेगळ्या तिहाया हे दुसरे फार मोठे आकर्षण यात आहे.(मी स्वतः १९५८ ते १९६३ मध्ये यवतमाळला पं.दादासहेब पांडे यांचेकडून तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असल्यामुळे तबल्या विषयी लिहू शकलो.) त्यामुळे राग जरी एकच असला तरी पण त्याची विविध रुपे आपल्यासमोर उभी राहतात.मला जर गझल गायन ऐकायला का आवडते ? असा कोणी प्रश्न केला तर, गझलमध्ये काव्य,संगीत आणि ताल या तिन्हीची मजा घेता येते’,हे माझे उत्तर राहील....
          या गझलचा मतला इतका सुंदर आहे. की उर्दू न जाणणाराही या काव्याच्या मोहात पडेल. पंरतू पुढील शेर कु--कू, दु--दू अशा शब्दांनी भरल्यामुळे आमच्यासारख्या गावरान माणसाच्या टाळक्यात दाग़ शिरत नाही.फ़क्त गुलामअलीच लक्षात राहतो आणि भावतो. तरी पण आपसे तुम, तुमसे तू, होने लगी..." हे मात्र अंतर्मनात कायम रुंजी घालत राहाते. ऐका तर ... रंज की जब गुफ़्तगू होने लगी ......

रंज की जब गुफ़्तगू होने लगी
आपसे तुम,तुम से तू होने लगी
चाहिए पैगामबर दोनो तरफ
लुत्फ़ क्या जब दु--दू होने लगी

मेरी रुसवाई की नौबत आ गयी
उनकी शोहरत कु--कू होने लगी
ना उम्मीदी बढ गयी है इस क़दर
आरज़ू की आरजू होने लगी
अब के मिलकर देखिए क्या रंग है
फिर हमारी जुस्तजू होने लगी
दाग़ इतराते हुए फिरते है आज
शायद उनकी आबरू होने लगी
दाग़- ग़ुलामअली

(वरील लेखात भूप रागातील भूपेन हजारिका यांनी स्वरबद्ध केलेले,लताबाईंच्या आवाजातीलरुदाली या चित्रपटातील "दिल हूम हूम करे..." हे गाणे अनवधानाने राहून गेले.या गाण्याशिवाय वरील लेख पूर्णच होऊ शकत नाही. सुंदर शब्द,आवाज आणि संगीत याची मनस्वी एकरूपता यात आहे.)

क्या भला मुझको परखने का नतीजा निकला...



           मेहदी हसन खाँ साहेबांनी गायीलेली मुज़फ्फर वारसी यांची ही गझल मी अंदाजे ३५/३६ वर्षांपुर्वी मनसोक्त ऐकली ती सुरेश भटांमुळे.या गझलची बंदिश मालकौंस या सुंदर आणि लोकप्रिय रागात आहे.गायक,वादक,संगीतकार यांचाही हा अत्यंत आवडता राग आहे.बिसमिल्ला खाँ साहेबांनी शहनाईवर वाजविलेल्या मालकौंसाची ध्वनिमुद्रिका आजही सीडी च्या रुपात मंगल कार्यात वाजत असते.बैजू बावरा या चित्रपटातील रफी साहेबांनी गायीलेले "मन तरपत हरि दरशन को आज" हे गाणे आजही टवटवीत आहे.नवरंग चित्रपटातील "आधा है चंद्रमा रात आधी,रह जाए तेरी मेरी बात आधी" आणि "तू छुपी है कहाँ मै तडपता यहाँ" ही गाणीही मालकौंस रागातीलच आहे.संगीत नाटकांमध्येही या रागाचा मुक्तपणे वापर केलेला दिसतो.रणदुंदुभी नाट्कातील "दिव्य स्वातंत्र्य रवी",मृच्छकटीक मधील "तेचि पुरूष दैवाचे" वगैरे-वगैरे."अणुरणिया थोकडा,तुका आकाशाएवढा"हा भीमसेनांच्या आवाजातला अभंग ही त्याची उदाहरणे...असा हा श्रीमंत राग मालकौंस...या रागात सा नि असे फक्त पाचच स्वर लागतात.गांधार,निषाद,धैवत हे स्वर कोमल आहेत.बस्स...पण या पाच स्वरांमधील जादू वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलीच असेल.
           वरील सर्व गाणी अतिशय कर्णमधुर आहेत यात काही वादच नाही.प्रत्येक संगीतकार,गायक,वादकांनी आपापल्या प्रतिभेनुसार हा राग लोकांसमोर ठेवला.परंतू या सगळ्यांपेक्षा वेगळ्या अंगाने जाणारी बंदिश हे या गझलचे वैशिष्ठ्य आहे.त्यातही अंतर्‍यात केलेली कलाकुसर हृदयाला भिडणारी आहे.या गझलची माझ्या आयुष्यात वेगळी अशी जागा आणि आठवण आहे.सुरेश भटांशी मैत्री झाल्यानंतर त्यांनी मला सर्वप्रथम "हा ठोकरुन गेला" आणि "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही" या दोन गझला मला स्वरबद्ध करायला दिल्या.यावेळी मी आँर्केस्ट्रा सोडून नुकताच आर्णी (जि.यवतमाळ) या खेड्यात संगीत शिक्षक म्हणून रुजू झालो होतो.भरज्वानीचा की काय म्हणतात असा तो काळ होता.१५/२० दिवसानंतर नागपुरला धनतोलीच्या त्यांच्या निवासस्थानी या दोन्ही गझलांना बसविलेल्या चाली ऐकविल्या."ठोकरुन"ची चाल त्यांना आवडली.परंतु "कुठलेच फूल" ला बसवलेली किरवाणी रागातील उडती चाल त्यांना बिलकुल आवडली नाही.त्यांचा स्वभाव तसा अतिशय फटकळ आणि मिश्किल असल्यामुळे ते मला म्हणाले" सुधाकरराव तुमची ही चाल म्हणजे एखाद्या घरंदाज बाईला तमाशात नाचवण्याचा प्रकार झाला आहे!"...त्यांना काय म्हणायचे आहे हे मला क्षणभर समजले नाही.पण काही तरी चुकल्याचे लक्षात आले.माझा गोंधळलेला चेहराबघून त्यांनी एक भली मोठी लोखंडी ट्रंक उघडली,त्यात खच्चून कँसेट्स भरलेल्या होत्या. त्यातल्या / कँसेट्स मला दिल्या.(सुरेश भट त्यांच्या संग्रहातील कँसेट्स आणि पुस्तके कोणालाही देत नसत.या बाबतीतले त्यांचे विचार अतिशय परखड ठाम होते.) परंतू कँसेट ऐकण्याकरीता माझ्याकडे टेपरेकाँर्डर नव्हते.म्हणून त्यांना कोणीतरी भेट दिलेले त्यांच्याजवळचे एकमेव टेपरेकाँर्डर मला दिले आणि गझल गायकीचा अभ्यास करायला सांगितले.ते सगळे घेऊन मी आर्णीला आलो.माझ्यासाठी हा फार मोठा आणि मोलाचा खजिना होता.कारण रेडिओवर त्याच्या मर्जीने लागलेल्या गझला कधी-मधी ऐकणे आणि कँसेटवरून सतत ऐकणे यात खूप फरक आहे.आज इंटरनेटमुळे एका क्लिक वर हवे ते सापडते.तेव्हा मात्र एखादे आवडीचे गाणे ऐकायचे असेल तर दिवसभर रेडिओ कानाला लावून बसावे लागायचे.नशीब की त्या काळात छोटेखानी ट्रांझिस्टर रेडिओ उपलब्ध होते.हे सगळे सांगायचे कारण असे की,यातील मेहदी हसनच्या कँसेटमध्ये कधीकाळी पाकिस्थान रेडिओवरून ऐकलेली काळीज कापणारी आणि सुरावटीचा खूप विचार करायला लावणारी वरील गझल त्यात होती.आम्ही शिकलेलो मालकौंस वेगळा होता आणि हा मालकौंस काही वेगळाच भासत होता.मालकौंस मधील बहुतेक रचना षड्जापासून सुरू होतात.याला काही अपवाद असतीलही पण ठोकळमानाने हा परिपाठ आहे. परंतू या गझलची सुरवात मध्य सप्तकातील लोमल निषादापासून झाली आहे.पुढेपरखनेका या शब्दांसोबतचा स्वरगुच्छ आणिने या अक्षरावरील मध्यमाला घासून जाणारी सम....अरारारारा....................काळजाची चाळणच.....लाजवाब ! पुढेनतीजा निकलावरील तार षड्जापर्यंत जाऊन वापस षड्जावर येणारी सुरावट...माशाल्ला ! आपण ऐका....एक वेगळे स्वरशिल्प आपल्यासमोर येईल.
           मुज़फ़्फ़र वारसी यांच्या या गझलमधील एक एक शेर जसा दमदार आहे.तसेच खाँ साहेबांचे सादरीकरणही कलदार आहे.अंतर्‍यामध्ये त्यांनी मुर्छना पद्धतीचा अतिशय सुंदर प्रयोग करून सोहनी या रागाचा आभास निर्माण केला आहे.त्या वेळीक्या बात है................’ असे आपसुकच तोंडातून निघुन जाते.वास्तविक पाहता मालकौंस आणि सोहनी या हे दोन्ही राग सगळ्याच बाबतीत परस्पर विरोधी आहेत.दोन्ही रागात एकही साम्यस्थळ नाही.तरी पण हे त्यांनी केले...अगदी बेमालुमपणे.तुम्ही कधी आम्रखंड खाल्ले आहे का ? बस...नेमके तसेच...आम्रखंड खातांना श्रीखंड खाण्याचा आनंद मिळतो.त्यात आमरसाची जी थोडी-थोडी वेगळी चव जिभेला जाणवत राहाते पण नकळत...तसलच काहीतरी हेप्रकरण आहे.ऐकल्यावर त्याची लज्जत आपणास कळेललच......ऐका तर..."क्या भला..."

क्या भला मुझको परखने का नतीजा निकला
ज़ख्म--दिल आपकी नज़रों से भी गहरा निकला

तोडकर देख लिया आइना--दिल तूने
तेरी सूरत के सिवा और बत क्या निकला

जब कभी तुझ को पुकारा मेरी तनहाई ने
बू उडी फूलसे,तस्वीर से साया निकला

कोइ मिलता है तो अब अपना पता पूछता हूं
मैं तेरी खोज में तुझ से भी परे जा निकला

तिश्नगी जम गयी पत्थर की तरहा होटोपर
डूबकर भी तेरी दरिया से मैं प्यासा निकला

शायर - मुज़फ़्फ़र वारसी
आवाज़ - मेहदी हसन
-
मेहदी हसन